लेखमालिका-१: मंदिर -१ : भुलेश्वर, माळशिरस, पुणे.
दैवत: भगवान शंकर स्थान: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील माळशिरस येथील यवत गावाजवळच्या टेकडीवर.
कोरीव दगडी शिल्पकृती
Aditya Rewadkar
11/25/20241 min read


पौराणिक पार्श्वभूमी : हे असे पौराणि ठिकाण आहे कि, जिथे शंकर तपश्येला बसले असताना पार्वती भिल्ल स्त्रीच्या वेशात आली आणि नृत्य करू लागली. त्यामुळे शंकराची तापशचर्या भंग झाली. ते पर्वतीवर मोहित झाले व त्यांनी कैलासाला प्रस्थान ठेवले. तिथे ते विवाहबद्ध झाले. शंकर आपली तापशचर्या विसरले, म्हणून त्यांना 'भुलेश्वर' हा नाव प्राप्त झाले, अशी दंतकथा आहे. हिंदू कथेनुसार पाच पांडवांनी हे मंदिर बांधले आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी: सध्याचे मंदिर बांधण्यापूर्वी मूळ मंदिर पांडवांनी बांधले असावे. सध्याचे मंदिर यादव राजा कृष्णदेवराय याने बाराव्या शतकात बांधले. मूळ मंदिराची पुनर्बांधणी किंवा विस्तारीकरण त्याच्या काळात झाले असावे. मुघलांच्या काळात या मंदिराची तोडफोड झाली. शिवाजी महाराजांना जावळीच्या खोऱ्यातून बाहेर काढण्यासाठी अफझलखानाने हे मंदिर उद्वस्त करण्याचा प्रयत्न केला असे म्हणतात. याच कारणासाठी मंदिराचे प्रवेशद्वार लपलेले आहे. शिवाजी महाराजांच्या काळात 'गायमुख बुरुज' नावाने एक नवीन पद्धत अवलंबण्यात आली होती. सिंधुदुर्ग किल्य्याचे प्रवेशद्वारही याच पद्धतीचे आहे. मंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते बाहेरून इस्लामी पद्धतीचे वाटते, व इस्लामी लुटारूंकडून निर्दयपणे उध्वस्त होण्यापासून वाचविणेकरिता त्याचे बाह्यरूप असे केले होते. १६२९ मध्ये आदिलशाही हिंदू जनरल मुरार जगदेवने, पुण्यावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला. त्याआधी त्याने पुणे लुटले होते. आता त्या किल्ल्याचे बुरुजरुयी अवशेष फक्त शिल्लक आहेत.
स्थापत्यशैली: मंदिर काळ्या बसाल्टमध्ये बांधले आहे, जो आजूबाजूच्या तपकिरी बसाल्ट दगडापेक्षा वेगळा आहे. त्यामध्ये कॅल्शिअम चे प्रमाण अधिक आहे. मूळ दगडी शिखर तोडल्यानंतर पेशव्यांच्या कालावधीत अठराव्या शतकात नवीन शिखर विटा, चुना व जिप्सम यामध्ये बांधण्यात आले.
संपूर्ण मंदिर एका उंच चौथऱ्यावर बांधले आहे. हा चौथरा ३-४ मीटर उंच आहे. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर अप्रतिम कोरीव काम आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर ब्रम्हा,विंष्णू व महेश कोरलेले आहेत. यातील शिवाच्या प्रतिमेवर दरवर्षी २७ मार्च रोजी उगवत्या सूर्याची किरणे पडतात. नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा असे मंदिराचे भाग आहेत. नंदीमंडपातला नंदी १.५ ते २ मीटर इतका उंच आहे. भव्य नंदी कोरीवकामाने नटलेला असून नंदीमंडपही तितकाच आकर्षक आहे. सभामंडपात कासव जमिनीवर कोरलेले नसून अनोख्या पद्धतीने आयताकृती उंच चौथऱ्यावर कोरले आहे. सभामंडप व गाभारा दोन्ही दरवाजे कोरीव कामाने सुशोभित आहेत. भिंतीवर वादक, अप्सरा यांची शिल्पे आहेत. दुर्दैवाने ती भग्न अवस्थेत आहेत, पण तरीही त्यांचे मूळ सौदर्य उमजून येते. भिंतीवर रामायण, महाभारत, विष्णुपुराण यातील प्रसंग कोरले आहेत. मंदिराच्या स्तंभावर विविध भौमितिक आकृत्या कोरल्या आहेत. स्तंभशीर्षावर उलट्या नागाचे फणेही कोरले आहेत. बाराव्या शतकातील यादवकाळात अश्या प्रकारचे कोरीव काम प्रचलित होते. मंदिराच्या अंतर्भागात दक्षिणी स्थापत्याचा प्रभाव दिसून येतो. विविध शिल्पपट व कोरीव काम यांचेमध्ये असलेल्या सपाट भिंती व मंदिराची वेगळी रचना यामुळे छाया-प्रकाशाचा एक अद्भुत खेळ मंदिरात पाहता येतो व त्यामुळे एक गूढ वातावरणही अनुभवायला मिळते.
प्रदक्षिणा मार्गावर दोन स्तंभामधल्या वरच्या आडव्या भागावर गणेश, शिव, ब्रह्मा, इंद्र हे स्त्रीरूपात कोरलेले पाहायला मिळतात. त्यांची नवे अनुक्रमे गणेशांनी, माहेश्वरी, ब्राह्मी, कुमारी, वैष्णवी व इंद्राणी अशी आहेत.
गाभाऱ्याच्या द्वारावर पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचतत्वे कोरली आहेत. गाभाऱ्यात एकूण ५ शिवलिंगे आहेत. वरचे मोठे शिवलिंग पुजण्यात येते. त्याखाली खळग्यात लपलेली शिवलिंगे उजेडात दिसू शकतात. गाभाऱ्याच्या छतावर सहस्रार चक्र कोरले आहे. योगाच्या साहाय्याने मानवी आत्म्याचा परमात्य्म्याशी होणाऱ्या मिलनाचे प्रतीक म्हणजे सहस्रार चक्र.
मंदिराचे शिखर नागर शैलीतील असून गिलाव्यात शेषशायी विष्णू, नक्षीकाम व पशु-पक्षी, सरपटणारे प्राणी कोरलेले आहेत. मुख्य घुमटावर अनेक रेषा कोरल्या आहेत व तो लहान लहान इतर घुमट व मिनार यांनी वेढलेला आहे. मिनारवरही नक्षीकाम व देवदेवता कोरलेले आहेत. छताच्या कठड्यावर कोरलेल्या मानवी आकृत्या निरीक्षणाचा व अभ्यासाचा विषय आहेत.
मंदिराच्या आवारात अनेक छोटी देवळे आहेत. टेकडीवर किल्ल्याचे अवशेष व एक मशीद आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूस पायथ्यापासून वर यायला दगडी रुंद पायऱ्या आहेत. आवारात पाण्याचे कुंडही आहे. पिंपळाची झाडे आहेत. वरून आजूबाजूचा सर्व परिसर दृष्टोत्पतीस येतो. तसेच उंचावर असल्यामुळे लांबून मंदिराची तटबंदी, मंदिराची बाह्यभिंत व भिन्न पातळीवरची आकाशात झेपावणारी शिखरे असे मनमोहक व कॅमेऱ्यात बंदीस्त करण्यास भाग पाडणारे दृश्य दिसते. हे मंदिर म्हणजे भारतीय शिल्प-कलेचा एक उत्तम अविष्कार आहे.